एकाच गर्तेतल्या आम्ही दोघी

      

 


  

शेवटचा झुरका मारून शलाकाने उरलेले फिल्टर ऐश्ट्रे मध्ये टाकले तशी ती पुन्हा आयफोनकडे पाहू लागली आणि तोच तो रिंग झालातिने लगबगीने फोन उचलला  ये..स

मॅडम मै कॅब ड्रायव्हर पोर्चमें गाडी लागाई है.

ओक्ये.. म्हणत फोन कट केला, बॅग खांद्यावर अडकवून जाता जाता तिने आवाज दिला. ओके बा..य बेबी.

बेडवरुन एक झिंगलेला गंभीर आवाज आला बाय स्वीटहार्ट, सी यु.. म्हणत पुन्हा झोपी गेला. तिने दरवाजा ओढून घेतला. एखाद्या मॉडेल प्रमाणे कॅट वॉक करत ती पॅसेजमधून लिफ्ट कडे निघाली काही गेस्ट लिफ्ट लॉबी मध्ये होते त्या सर्वांचेच लक्ष वेधून घेण्यासारखं तीच यौवन होतं त्यात टाईट फिटिंग जीन्स आणि पांढरा टॉप तो काहीसा पारदर्शक होता ज्यातून तिचं अंतर्वस्त्र आणि गोरं अंग स्पष्ट्पणे दिसत होते.

ती पोर्चमद्ये पोहोचली मध्यरात्र असल्याने बऱ्याच लाईट बंद होत्या त्यामुळे ते पंचतारांकित हॉटेल ही भेसूर वाटत होते गार्डने गाडीचा दरवाजा खोलून दिला ड्राइव्हरशी ओटीपी शेअर करताना तिने पर्समधून शंभर रुपये काढून गार्डला दिले तसा त्याने तिला अदबीने नमस्कार केला.

रस्त्यावरील गाड्यांचे प्रमाण तुरळक होतं. उद्याच्या प्रोजेक्ट प्रेझेन्टेशनचा विचार करत असताना एका चौफुलीवर वळताना गाडीचा वेग काहीसा कमी झाला तशी तिला रस्त्याच्या कडेला एक महिला दिसली दोन इसम तिच्याशी हुज्जत घालत होते. तिने ताबडतोब गाडी मागे घ्यायला सांगितली. ड्राइव्हर ने त्या महिलेकडे पाहताच अरे मॅडम ये तो एक रंन-- मतलब ये अच्छी औरत नहि है .

मुझे मत सिखावं, इन्सान तो है ना ?  तो एकदम गप्प झाला 

तिने खिडकीची काच खाली करून विचारले  तुम्हाला काही मदत हवी का ?

हो. होहो.. मला इथे पुढेच जायचं आहे, मला सोडाल का प्लिज ? तसे तिच्या जवळ उभे असलेले बेवडे मागे सरकले .

 शलाकाने डोळे मिचकावत स्मित केले आणि हाताने गाडीत बसण्याचा इशारा केला तशी ती पटकन बसली.

लालभडक साडी त्यावर टिकल्याचं नक्षीकाम चमचम करीत होते, ओठांची लाली पुसली गेलेली होती गजर्यातील फुलेही निखळलेली होती केस विस्कटलेले, एक बट मात्र तिच्या गालावर होती. डोळे लहान मुलासारखे निरागस भासत होते. तिच्या सौदर्यात तसूभरही कमतरता नव्हती .

कुठे जायचे आहे तुम्हाला ?

तिने चटकन एका वेश्या वस्तीचं नाव घेतलं पण लगेचच चपापली मला उतरवू नका प्लिज मी भाड्याचे पैसे देईनपुन्हा ती भेदरल्या सारखी वाटू लागली . 

शलाका गालात हसली काही काळजी करू नकोस ताई मी सोडीन तुला.

आपुलकीच्या शब्दांची तिला आता सवय राहिली नव्हती तिचे डोळे भरून आले होते. मी कोण आहे हे समजून देखील तुम्ही मला ताई म्हणालात.

हो मग काय झालं मी तुझ्यापेक्षा लहान आहे ना आणि तूदेखील मला अहो काहो नको करुस .

क्षणात तिचा चेहरा खुलला डोळ्यातील पाणी लपवत. बरं बाई तुझं नाव तरी सांग .

मी शलाका. 

मी रत्ना, पण वस्तीत मला ऐश्वर्या म्हणतात .

पण, इतक्या रात्री तू इथे कशी ?

अगं..काय सांगू तुला नेहमीच्या कश्टमरने फुल नाईट साठी आणले होते सुट्टीचा दिवस असल्याने दिवसभर कश्टमर जास्त होते अगदी दुपारचे जेवायलाही वेळ नव्हता. त्यात हा हलकट चंदू मला नाईट साठी घ्यायला आला. मला जायचं नव्हतं कारण खूप थकली होती गं.. पण आमच्या आक्काला १५०० कमिशन मिळणार म्हणून तिने मला जायला सांगितले.

म्हणजे तुला काही देत नाहीत ?

काम झाल्यावर कश्टमर उरलेले १५०० आम्हाला देतात. रिक्षात जाता जाता एक वडा पाव तेवढा खाल्ला. त्याच्या घरी गेले तर आधीच दोन जण दारू पित बसलेले होते. मी समजून गेली चंदू कडे रागाने पाहिलं तर हलकट म्हंटला, काम होनेसे पहले हि डेड कि बजाय ढाई हजार दूंगा, उपरसें खाना खिलाऊंगा पर मुड कि मा-भैन मत कर. बाटली अर्धी झाली अन आळीपाळीने त्यांनी त्यांचे काम उरकले. दारू संपली तसेच जेवणही संपले होते. ते नशेत डाराडूर झोपले मी आपली उपाशीच होती, म्हणून निघाली खरी पण त्या वस्तीत काळोखाशिवाय काहीच दिसत नव्हते घुशी पायाखाली फिरत होत्या कुत्रे भुंकत होती. भीती वाटायला लागली होती गल्ली बोळात काही लोकं झोपलेली होती फक्त ह्या रस्यावर प्रकाश दिसला तशी चालत आली. तास झाला तरी कुठलंही वाहन भेटेना, काही थांबत रेट विचारत, सोबत चलण्यास बोलत. मघाशी ते दोन बेवडे होते ना ते तर पन्नास रुपये दाखवून मला गळ घालीत होते.

पण तू इतकी घाबरली का होतीस ?

अब्रू लुटण्याचं भय नव्हतं ग, पण जवळ असलेल्या पैशांचं होतं एकटी बघून आम्हालाही लुटणारे असतात ना .

रत्नाचा परिसर जवळ आला होता. तिची उतरायची लगबग पाहुन

तुला आता जेवण मिळेल ना ?

कसले आलय जेवण, आता झोपीन तशीच .

मीही जेवली नाही, थोडे पुढेच माझं घर आहे जेवण झाल्यावर सोडींन पुंन्हा .

रत्नाने मान्य केलं तसे तिने ऑनलाईन फुडं ऑर्डर केली त्या पोहचल्या तसे जेवणही पोहचले होते दोघीही फ्रेश झाल्या तसे शलाकाने प्लेट लावल्या .

शलाकाचे अलिशान घर पाहून ती श्रीमंत असल्याची खात्री झाली पण ती एकटी असल्याने रत्नाला प्रश्न पडला .

तुझे आईवडील कुठे आहेत ?

शलाका गालात हसली, अग मी मूळची हिमाचलची इथे मी शिक्षणासाठी आले आहे हा फ्लॅट भाड्याचा आहे, माझा नाही काही. हि ऐश म्हणजे आमच्या क्लबची मेहरबानी आहे.

म्हणजे ?

तिने शांतपणे दीर्घ श्वास घेतला. अग ताई, तू जे काम करतेस ना तेच मीही करते फक्त आम्हाला कॉलगर्ल म्हणतात.

रत्ना जेवायची थांबली आश्चर्याने, अग हे काय नवीनच, तू शिकतेस ना मग हे.. हे असं का करतेस तू ?

शलाका काहीशी डिवचली गेली खरी, पण तिची भूमिका रास्त आहे असं वाटून ती सांगू लागली. 

.. चांगल्या मोठ्या कॉलेजात ऍडमिशन झाले होतं पण सोबत असणाऱ्या ईतर मुलींचे ब्रँडेड कपडे, रिच लाइफस्टाइल या सगळ्या गोष्टींचा हेवा वाटायचा. त्यात ह्या श्रीमंत मुली माझ्यासारख्या मध्यमवर्गीय मुलींना कमी लेखत बोलायलाही कडत असत. बऱ्याच साऱ्या गोष्टींची गरज होती पार्ट टाईम काम करून इतका पैसे कमावणे शक्य नव्हते त्यात अभ्यासाला हि वेळ हवा होता मग ह्या क्लबची माहिती मिळाली जिथे कमी वेळात कमिशन कापून हि हजारो रुपये मिळू लागले माझ्या जीवनाला कलाटणी मिळाली.

रत्नाला ऐकून धक्का लागला होता डोकं चक्रावुन गेले तसा तिने पुन्हा प्रश्न केला तुझ्या आईवडिलांना माहिती आहे ?

नाही .. आणि कळणार हि नाही माझं शिक्षण पूर्ण झालं कि मी माझ्या पायावर उभी राहीन माझी स्वप्न पूर्ण होतील मग कशाला करिन हा जॉब .

रत्नाने डाव्या हाताचा अंगठा व त्याशेजारील दोन बोटांनी कपाळाच्या कोपर्यावर हात लावून शलाकाकडे एकटक पाहत राहिली .

अशी काय पाहतेस, अगं खरीददार आहेत म्हणून विक्री करणारे मिळतात. आठवड्यातून एक दोन जरी कॉल केले ना तरी हजारो रुपये मिळतात त्यासाठीही कला लागते म्हणा. आपण खूप नाजूक आहोत अशी ऍक्टिंग करून क्लाईंटला खुश करण्यासाठी जरा मादक आवाज काढले, चांगला प्रतिसाद दिला कि बस.. ठरलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे मिळतात पर्सनल नंबर घेतात व नेक्स्ट टाईम कमिशन शिवाय क्लाईंट फिक्स होतो महागडी दारू प्यायाला मिळते लाइफ एन्जॉय होते आणखीन काय हवय ? खूप साऱ्या मुली हे काम करतात अगदी हाऊस वाईफ देखील करतात. काही श्रीमंत स्रियांची भूक भागवण्यासाठी तरुण मुले सुद्धा ह्या व्यवसायात आहेत त्यांना जीग्लो म्हणतात .

रत्नासाठी माहितीचं एक नवीन दालन उघडले गेलं होतं. ती सहज बोलली म्हणजे सामन्यांना श्रीमंत लोक विकत घेतात असच ना ?

असं काय बोलतेस ? तू सुद्धा शरीर विकतेचं ना ?

हो .. पण माझ्यात आणि तुझ्यात फरक आहे मला जर तुझ्यासारखी शिक्षणाची संधी मिळाली असती तर मला कधीच चैन करण्याची गरज भासली नसती,कुणी मला कमी लेखलं असत तरी चाललं असत पण मी शरीर कधीच विकलं नसत.

शलाका कुत्सितपणे हसता हसता बोलली अग मग ... आज का विकतेस...  ?

रत्ना सुद्धा उसनं हसून बोलली,

 मी माझ्या मर्जीने वेश्या नाही झाले मीच काय रांड बाजारातील एकही वेश्या आपल्या मर्जीने ह्या दलदलीत येत नाही ग. त्यांना जबरदस्तीने आणले जातं शक्यतो सगळ्यांनाच फसवून आणले जाते कुणी नोकरीच्या आशेने येतात तर कुणी लग्नाच्या अमिषाला बळी पडतात कुणाचं सौन्दर्य हे शाप ठरलेले असते अथवा गरिबी निमित्त ठरते आणि बाजारात विकल्या जातात परंतु त्या ताबडतोब कधीच तयार होत नाहीत त्यांना खूप मारहाण होते उपासमार करवतात जेव्हा तिला काहीच पर्याय उरत नाही तेव्हा ती हे जीवन स्विकारते. एका इसमाचे आम्ही ३०० रुपये घेतो त्यात अर्धे म्हणजे १५० रुपये आक्काचे असतात.

तुमच्या व्यवसायात तुम्ही स्वतःच्या मर्जीने आलेल्या असतात हजारो रुपये मिळतात सोबत सन्मानही मिळतो कारण तुमचं गुपित कुणाला कळत नाही, तुमच्या घरच्यांनाही नाही त्यामुळे समाजात तुम्ही उजळ माथ्याने फिरू शकता. तुमची पाहिलेली स्वप्ने पूर्ण करू शकता ...  हजारो रुपये मिळवून देखील तुम्ही ते चैन म्हणून स्वतःवर उडवता.

आमचं मात्र तसे नाही चैन आंणि आमचा दुरून दुरून संबंध नाही आमच्या तुटपुंज्या मिळकतीतही आम्ही घरी पैसे पाठवतो. शोकांतिका हि आहे कि आमच्या घरच्यांना वेश्येचा पैसा चालतो पण वेश्या असलेली मुलगी, बहीण नाही चालत. माझ्या घरच्यांना जेव्हा माझा व्यवसाय समजला तेव्हा त्यांनी मला निक्षून सांगितले तू नासलीस, आम्हाला मेलीस पुन्हा घरी कधीच येऊ नकोस. अचानक तिचा आवाज रडवेला झाला होता. आधारासाठी शलाकाने तिचा हात हातात घेतला होता तीही गंभीरपणे ऐकत होती.

निर्लज्यासारखे मीच एकदा घरी फोन केला, भावाच्या शिक्षणासाठी पैशांची गरज आहे समजल्यावर मी ताबडतोब जमविलेले पैसे पाठवून दिले. माझ्या पैशांचा स्वीकार केला ग पण माझा कधीही नाही करणार. आणि तिच्या अश्रूंचा बांध तुटला.

शलाकाने तिला जवळ घेतले थोड्या वेळात ती काहीशी शांत झाली आणि पुन्हा रडवेल्या आवाजात सांगू लागली.

पिढ्यानपिढ्या आमच्या घरी दारिद्र होत आईसोबत शेतावर मजुरी करायची. शिक्षणाची आवड असूनही गरिबीमुळे शिकता आले नाही, पण सर्वसामान्य मुलीसारखं माझे हि स्वप्न होती मलाही संसार करायचा होता पण ह्या बाजारात सारी स्वप्ने जळून गेली. तरुणपण आहे तोपर्यंत धंदा, म्हातारपणात कुणी भीकही घालीत नाही. आम्हाला भोगणारे वा न भोगणारे सगळे आमच्याकडे तिरस्काराने पाहतात.

शलाका खूप गंभीर होऊन मदतीच्या जाणिवेने बोलली. माझ्या माहितीनुसार काही सामाजिक संस्था तुमच्यासाठी काम करतात त्यांची मदत का नाही घेत तू ?

हो खरं आहे काही संस्था कौतुकास्पद कार्य करतात वेश्येच्या मुलांसाठी शिक्षण आणि वेश्यांनी हा धंदा सोडून आपल्या पायावर उभे राहण्यासाठी खूप तळमळीने कार्य करतात मग हा वेश्या व्यवसाय आतापर्यंत बंद व्हायला हवा होता ना पण असे होत नाही कारण त्यांनाही काही मर्यादा असतील ना, खर तर त्यांना त्यांच्या कार्यात यशस्वी होऊ दिल जात नाही.

आमच्या ठेकेदारांना ह्या बेकायदेशीर धंद्यालाही खादि आणि खाकीच संरक्षण लाभलेले असतं अगदी वरपर्यंत हफ्ते पोहचतात. पळवून आणलेल्या कोवळ्या मुली कुठे डांबून ठेवल्यात हे माहित असून देखील हे कायद्याचे रक्षक खाल्ल्या मिठाला जागतात .

खर म्हणजे वेश्या नसतील तर बलात्काराचे प्रमाण खूप वाढेल असा गोड गैरसमज आहे इथल्या तथाकथित विद्वानांचा. आमच्या अनुभवानुसार येणाऱ्या गिऱ्हाईका पैकी काही मनोरुग्ण विक्षिप्त असतात तर बहुतेक बेवडे, नशेडी असतात गांजा, चरस आणि काहीबाही नशा करणारे हे महाभाग. बलात्कार करणारे बहुतेक ह्याच वर्गातील असतात, हे त्यांच्या स्वतःच्या आयाबहिणींना हि ओळखत नाहीत यांना आवर घालायचा सोडून अथवा सुधारणा करण्याच सोडून अशा हलकट लोकांसाठी रांडबाजार अबाधित ठेवीत आहेत.

मला एक प्रश्न पडलाय स्वताच्या मर्जीने शरीर विकणारी हि तरुण पिढी उदयास आल्यास कदाचित कालांतराने जबरदस्ती अथवा फसवणूक करून वेश्या घडविणारे हे कुंटणखाने बंद होतील ?

शलाकाला काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हत तिच्या डोक्यात आता विचारांचं काहूर माजलं होत,काही न बोलता ती एका अनुमानावर ठाम झाली.

स्वातंत्र्य.. अशा ह्या देशात एक वर्ग दुसर्या वर्गाची पिळवणूक करतो हेच सत्य आहे गुलामी करणार्या वर्गाला ते गुलाम आहेत याची जाणीव नसावी हिच एक शोकांतिका आहे.

अचानक तिने रत्नाची प्लेट पहिली. अग तू काहीच खाल्ल नाहीस.

नको, भूकमोड झाली माझी.. निघते मी आता सकाळचे ४ वाजलेत.

शलाकाने तिला कॅब बुक करून गाडीत बसवून पुन्हा वर आली. रत्नाच्या प्लेट जवळ तिला चुरगळलेल्या मळकट रोल झालेल्या अशा ५०० च्या दोन नोटा दिसल्या. तिला वाटले रत्ना विसरली कि काय ? अचानक तिला त्या धूसर दिसू लागल्या तिने दोन्ही डोळे चोळले त्यातून डबडबलेले अश्रू ओघळले, अनं तोंडातच पुटपुटली.. 

समाजात जिला काडीचा हि सन्मान नाही ती आपला आत्मसन्मान आजही जपते !

सलाम तुला ताई...

 


-विनोद पांडव