कोरोनाच्या नावानं चांगभलं



एक व्हायरस विमानातून आला 
अन रिक्षा, टॅक्सीतून वस्त्या वस्त्यांत गेला 

विचारांची आंदोलनं दडपायला 
खरं तर तूच निमंत्रण दिलंस त्याला 

टाळ्या, थाळ्या अन दिवाळी साजरी करून 
मदाऱ्या तू माकडांचा विश्वास साधला 
 
पंधरा लाखांसारख्याच साऱ्या तुझ्या वल्गना ठरल्या फोल 
तरीही माकडांना कळून आला नाही तुझा झोल 

पुन्हा पीडित फंडासाठी भीक मागताना 
श्रीमंत फकीर नाही लाजला 

वर आत्मनिर्भर होण्यासाठी आदेश काढला !

मंदिरातील एकही दानपेटी नाही आली कामी 
मग देशभक्त होऊन दिलं सर्व काही आम्ही 

वर्क फ्रॉम होम वाले
रोज नवीन रेसिपी चाखत होते 
अन आमचे मात्र उपासमारीने
जीव जात होते 

'कोरोना योद्धा' म्हणून नेते सन्मानाने 
प्रमाणपत्र आम्हाला वाटीत होते 
आमचे मृतदेह मात्र आमच्याच 
घरचांना बाटवीत होते 

"मी येणार,मी पुन्हा येणार"असे म्हणणारे 
गल्ली बोळातही फिरकत नव्हते 

फ्रंटलाईनला मेडिकल स्टाफ,पोलीस अन 
आपात्कालीन विभाग लढता लढता मरत होते 
बोलघेवडे राजकारणी मात्र आणखीन मागे मागे सरत होते 
अपवाद काही सच्चे जमिनींवर काम करत होते 

पण धारावीचे श्रेय घ्यायला चड्डीवाले रडत होते 

मास्क,सॅनिटायझर,लॉकडाऊन,
फिझिकल ! नव्हे सोशल डिस्टंसिंग ,
कंटेनमेंट झोन,कॉरंटाईन ,बेरोजगारी,
स्थलांतरित लोंढे,अपघात,आत्महत्या,उपासमार,
अवेळी मरण आणि भेदभाव 
यापैकी आमच्या वाट्याला काहीच नसते . 

जर... कॅरिअर असणारे उपऱ्यांचे  जत्थे 
                                                         विमानतळातच रोखले गेले असते ..